चिमुकलीचा प्रश्न आणि `शर्मेने बड्या खाकीच्या चिंध्या`
एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणा-या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं समाज हादरून गेला आहे.
रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : प्रांजल... वय वर्ष तीन... मात्र तिच्या एका प्रश्नानं सांगली पोलिसांना शरमेनं मान खाली घालावी लागलीय. एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणा-या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं समाज हादरून गेला आहे.
मम्मी पप्पाला मारुन आले का?
मम्मी पप्पाला मारुन आले का? या गर्दीतून येणारा हा चिमुकलीचा आवाज. पुन्हा एकदा ऐका ही चिमुकली काय म्हणते आहे.
काळीज हेलावून टाकेल आर्त सवाल
कुणाचंही काळीज हेलावून टाकेल असा हा आर्त सवाल, आहे सांगलीतील मृत अनिकेत कोथळे याच्या तीन वर्षाच्या लेकीचा.
विश्वास नांगरे पाटील सांत्वनासाठी पोहोचले
कायदा आणि सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि इतर पोलिसांचा ताफा शनिवारी अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पोहचले.
तिच्या एका वाक्यानं सगळ्यांचेच डोळे पाणावले
यावेळी सगळे पोलीस अधिकारी कोथळे कुटुंबीयांचं सांत्वन करत असताना, प्रांजलनं तिच्या आईला एक प्रश्न विचारला. हृदय हेलवणाऱ्या तिच्या एका वाक्यानं सगळ्यांचेच डोळे पाणावले.
पोलिसांवर अक्षरक्ष: तोंड लपवण्याची वेळ
तीन वर्षाच्या मुलीनं केलेल्या या प्रश्नामुळे पोलिसांवर अक्षरक्ष: तोंड लपवण्याची वेळ आली. अनिकेतच्या आईनं नराधम मारेक-यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मारेकऱ्यांना शिक्षा मिळेलही पण चिमुकलीनं गमावलेल्या पितृछत्राचं काय?