नवी दिल्ली : अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजुर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार आता दिलीप वळसे पाटील यांचेकडे देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांनी आज शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर अनिल देशमुख हे थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत ते कोणाला भेटणार याबाबत चर्चा सुरु होती. पण ते आता अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरी दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टात याचिका करण्यासंदर्भात या दोघांमध्ये चर्चा होणार आहे.


अभिषेक मनु सिंघवी हे वरिष्ठ वकील आहेत. सुप्रीम कोर्टात त्यांनी अनेक महत्त्वाच्या केसेस लढवल्या आहेत. सोबतच ते काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते देखील आहेत. ते राज्यसभेचे सदस्य देखील आहेत.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणात अनिल देशमुख हे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचं दिसतं आहे.


हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टात आव्हान देतील. यासाठी अभिषेक मनु सिंघवी हे सुप्रीम कोर्टात त्यांची केस लढवतील.