अनिल देशमुखांकडून डोंबाऱ्याचा खेळ करण्याऱ्या आज्जीला १ लाखांची मदत
आजीबाईचं कौशल्य आणि कला पाहून थक्क व्हायला होतं.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोटाची खळगी भरण्यासाठी एक आजी डोंबाऱ्याचा खेळ करत आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरते. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील कुटुंबातील १७ जण उपाशी राहू नये म्हणून ही आजी आपल्या नातवंडांसाठी थरारक कामगिरी करत आहे. या आज्जीबाईंचे नाव शांताबाई पवार आहे. आयुष्याच्या उतार वयात देखील ज्या सफाईनं आज्जीबाई काठी चालवत आहेत ते पाहून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आज्जीबाईंचं कौशल्य पाहत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज्जीबाईंची भेट घेतली. यावेळी त्यांनी आज्जीबाईंना १ लाख रूपयांची मदत देखील केली. शिवाय साडी चोळी भेट स्वरूपात दिली. पुण्याच्या हडपसर परिसरात राहणारी ही आजी डोंबाऱ्याचा खेळ करते.
आजीबाईचं कौशल्य आणि कला पाहून थक्क व्हायला होतं. काठ्या फिरवणे, तारेवरची कसरत, थाळीवर चालणं अशा साहसी कला आज्जीबाईना अवगत आहेत.स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याबरोबरच ही लोप पावत असलेली कला जोपासण्याचा वसा त्यांनी घेतलाय. सध्या महामारीच्या काळात त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलीय.
महत्त्वाचं म्हणजे या आजीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्या एका सिनेमातही काम केले आहे.आतापर्यंत आजीने तीन सिनेमात काम केले आहेत. गीता और सीता, शेरणी आणि त्रिदेव या चित्रपटात आजी चमकली आहे. आजीला एकूण १७ नातवंडे आहेत. आजीची मुलं आणि मुली यांची ही मुले आहेत.