मुंबई : ​नरेंद्र मोदी सरकारने काही ना काही बहाणे करुन 5 वर्षे काढली. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची या सरकारची इच्छा नाही अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथून केली आहे. लोकपाल, लोकायुक्त जनतेच्या हातात आहे. जनतेने पुरावे दिल्यानंतर पंतप्रधानांच्या घोटाळ्याची चौकशी लोकपाल करु शकते.  तसेच राज्यामध्ये लोकायुक्त ही कामगिरी करेल. 4 वर्षै झाली पण हे सरकार कार्यवाही करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. लोकपाल नियुक्तीसाठी राळेगणसिद्धी येथे सुरू होत असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती अण्णांनी फेटाळली आहे. अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम असून राळेगणसिद्धी येथे अण्णांच्या उपोषणाला सुरूवात झाली आहे. अण्णांची समजूत काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धीच्या दिशेने रवाना झाले. पण आपण उपोषणावर ठाम असल्याचे अण्णांनी कळवल्यानंतर महालक्ष्मी हॅलीपॅडवरूनच जलसंपदा मंत्री महाजन परतल्याचे सांगण्यात येत आहे. अण्णांव्यतिरिक्त अद्याप तरी यामध्ये कोणी मोठा चेहरा सहभागी दिसत नाही. पण राळेगणसिद्धी वासियांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.लोकायुक्तांच्या कायद्यात माजी मुख्यमंत्री आहेत पण यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देखील असावेत अशी अण्णांची मुख्य मागणी आहे. कायदा करा किंवा अध्यादेश काढा अशी अण्णांची मुख्य मागणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझे आंदोलन कोणती व्यक्ती अथवा पार्टीच्या विरुद्ध नाही तर समाज आणि देशाच्या हितासाठी असल्याचे आण्णांनी यावेळी सांगितले. समाज आणि देशाच्या हितासाठी मी अनेक आंदोलन केली आहेत. तशाच प्रकारचे हे आंदोलन आहे. लोकपाल कायदा बनवून 5 वर्षे झाली पण कारणे देणेच सुरू आहे. सरकारच्या मनात खरच काही असत तर इतका वेळ लागला असता का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 2011-12 मध्ये आण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आमरण उपोषणाला बसून सरकारला हादरवलं होतं. या आंदोलनात कोणताही राजकिय पक्ष जोडला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 


अण्णा हजारे यांनी लोकपालच्या अंमलबजावणीवरून फडणवीस सरकारवर यापूर्वीही ताशेरे ओढले होते. लोकपाल कायदा झाल्यानंतर १ वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो. पण साडेचार वर्षानंतर मुख्यमंत्र्यांची अवस्था 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला', अशी झाल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली होती. 


तसेच अण्णा हजारे यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही धारेवर धरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने लोकपाल कायदा लागू केला नाही. आज हा कायदा अस्तित्त्वात असता तर राफेल घोटाळा झाला नसता. लोकपाल कायद्याच्या अंमलबाजवणीत चालढकल करून सरकारने जनतेची दिशाभूल केली, असे अण्णा हजारेंनी म्हटले होते.