`कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला...`; फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान
CM Devendra Fadnavis Speech: फडणवीस यांनी यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खात्याची पहिली बैठक घेतली तेव्हा काय सूचना केल्या हे ही सांगितलं.
CM Devendra Fadnavis Speech: नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी फडणवीसांनी केलेल्या भाषणामध्ये पोलिसांचं या अभिनव मोहिमेसाठी विशेष कौतुक केलं. यावेळेस फडणवीसांनी कॅनडासारख्या देशाचं उदाहरण देत तिथे अंमली पदार्थासमोर सरकार हरल्याचं नमूद केलं. मात्र त्याचवेळी भारत आणि महाराष्ट्र अंमली पदार्थांविरुद्धची लढाई जिंकू शकतो असा विश्वास केला. याच भाषणात फडणवीसांनी आपल्या कॉलेजच्या दिवसांचाही उल्लेख केला.
...तर सीमेचे रक्षण होईल कसे?
"नवी मुंबई पोलिसांचे मी अभिनंदन करतो कारण त्यांनी फार महत्वाचे कॅम्पेन लाँच केलं आहे," असं म्हणत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली. "गृह खात्याची पहिली बैठक घेतली त्यात प्रामुख्याने ड्रग्सच्या विरुद्ध मोठी लढाई लढायची आहे, असं अधिकाऱ्यांना सांगितलं. आपल्या देशावर थेट वार करता येतं नाही, ही परिस्थिती लक्षात आल्यावर तरुणाईला व्यसनथीन कसे करता येईल असा डाव देशात सुरु झाला. अमली पदार्थांचा प्रादुर्भाव देशात पाहायला मिळाला. सीमावर्ती राज्यांची युवाशक्ती ड्रग्सच्या अधीन राहिलं तर सीमेचे रक्षण होईल कसे? म्हणून हा विळखा घातला जातोय," असं फडणवीस म्हणाले. "कॅनडासारखा देश ड्रग्सपासून हारला. भारत ही लढाई जिंकू शकतो. महाराष्ट्र आणि भारताला ड्रग्स फ्री करावं लागणार आहे," असं फडणवीसांनी म्हटलं.
कॉलेजमधील दिवसांचा उल्लेख केला
ड्रग्जचं सेवन करणं हे कूल मानलं जात असलं तरी तसं नाहीये, असं मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला आवर्जून सांगितलं. "Doing Drugs Is Not At All Cool" असं म्हणतानाच फडणवीसांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांचा उल्लेख करताना आपण कधीच अमली पदार्थाला शिवलोसुद्धा नाही असं म्हटलं. "मी देखील कधीही अमली पदार्थाला शिवलो नाही. कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला (अमली पदार्थ सेवानाबद्दल) विचारायची," असं फडणवीस म्हणाले. तसेच, "प्रवाहाच्या विरोधात जाण्यासाठी मानसिक ताकद लागते," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी इच्छाशक्ती असेल तर ड्रग्जपासून दूर राहणं शक्य असल्याचं म्हटलं आहे.
ही न दिसणारी व्यवस्था
"अमली पदार्थांबद्दल बोलताना वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार होत आहेत. ही न दिसणारी व्यवस्था आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढने ही खरी देशभक्ती आहे. नवी मुंबई पोलिसांनी सर्वात प्रथम याला प्रतिसाद दिला, महाराष्ट्रात कुठेही कॅम्पेन करण्यासाठी जॉन अब्राहिम तयार आहेत असं म्हणाले. त्यासाठी त्यांचंही अभिनंदन," असं फडणवीस भाषणाच्या शेवटी म्हणाले.