योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : इगतपुरीजवळ आज अंत्योदय एक्स्प्रेसचा मोठा अपघात होता होता वाचला. कसारा घाटातल्या भीमा पुलावर अंत्योदय एक्स्प्रेस या गाडीच्या डब्याची दोन चाकं मध्यरात्री रूळावरून घसरली. तब्बल सात तासांनंतर गाडीतल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना दुसऱ्या गाडीने गोरखपूरकडे रवाना करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई - गोरखपूर असा प्रवास करणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसचा हा अनुभव तुमच्याही अंगावर काटा उभा करणारा ठरू शकतो. रात्री साडे तीन वाजता सर्व प्रवासी झोपेत असताना कसारा घाटातल्या पुलावर या गाडीचे गाडीचे मागचे डबे रूळावरून घसरले. मोठ्या आवाजामुळे मागच्या डब्ब्यातले लोक जागे झाले आणि ते पुढील डब्ब्यांकडे धावत आले. पुढील डब्यात अंधार असल्याने काय झालं त्यांनाही लक्षात आलं नाही. काहीच समजायला मार्ग नव्हता... सकाळी उजाडल्यावर पुलावर गाडीचे डबे घसरल्याचं लक्षात आलं. 


किरकोळ अपघात अशाच नजरेनं मध्य रेल्वे या अपघाताकडे पाहात होती. अखेर पहाटे 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गाडीजवळ प्रथम पोहोचली आणि अपघाताचं गांभीर्य रेल्वेच्या लक्षात आलं. प्रवाशांना चहा-पाणी काहीही उपलब्ध नव्हतं. मध्य रेल्वेची यंत्रणा सव्वा नऊ वाजता अखेर गाडीजवळ पोहोचली... मग एक विशेष गाडी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या गाडीच्या जवळ पाठवण्यात आली. प्रवाशांना मागच्या डब्यातून उतरवून मागच्या गाडीत नेण्यात आलं.


मध्य रेल्वेचे अधिकारी मात्र या अपघाताबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. एकूणच मध्य रेल्वेचं नष्टचर्य काही संपायला तयार नाही. तरी अधिकारी ढिम्मं आहेत. हाल मात्र प्रवाशांचे होत आहेत.