APMC Market Almonds Packing Video : नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये बदामाची अस्वच्छ पद्धतीने हाताळणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत गटार, फुटपाथवर अक्रोड आणि बदामाची छाननी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशीतील घाऊक मसाला बाजारात बेकायदेशीरपणे बदाम आणि अक्रोड फोडण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहेत. या कारखान्यातून बाहेर पडणारा फोडलेला अक्रोड आणि बदाम त्यानंतर छाननीसाठी बाहेर काढला जातो. मात्र छाननीसाठी बाजारातील गाळ्यात जागा नसल्याने, गाळ्याबाहेर उघड्यावर, गटारांवर आणि फरशीवर या अक्रोड आणि बदामाची छाननी केली जात आहे. विशेष म्हणजे तिथेच याची पॅकिंगही केली जात आहे. हे चित्र पाहून बदाम खायचे की नाही असा प्रश्न हा व्हिडीओ बघणाऱ्यांना पडला आहे.  


महिला कामगारांकडून उघड्यावर बदामाची छाननी


मसाला बाजारातील जी विंगमध्ये बदाम आणि अक्रोड फोडण्याचे कारखाने काही दिवसापासून चालवले जात आहेत. अक्रोडच्या कठीण कवचातून फोडून बाहेर काढले जाणारे बदाम, अक्रोडची त्यांच्या आकारानुसार छानणी केली जाते. ही छाननी करण्यासाठी बाहेर उघड्यावर तसेच जमिनीवर सोललेला बदाम टाकला जात आहे. यानंतर तिथेच त्या महिला कामगार बदामाची छाननी करत आहेत. विशेष म्हणजे उघड्या पायाने या महिला कामगार या ठिकाणी वावरत आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखाली हे बदाम तुडवले जात आहेत. तिथे या बदामाची छाननी केल्यानंतर पॅकिंगही केली जात आहे. 



नागरिकांच्या आरोग्याशी खेळ 


बदाम आरोग्यासाठी, शरीरासाठी पोषक असतात. त्यामुळे बुद्धी वाढते. त्यासाठी दररोज चार बदाम तरी खावेत असे म्हटले जाते. करोना काळापासून बदाम खाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बदामांना मागणी वाढली आहे. बाजारात बदाम 1000 ते 1500 रु किलोच्या घरात विकले जात आहेत. मात्र या बदामाची हाताळणी मसाला बाजारात ज्या पद्धतीने होत आहे ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पायाखाली तुडवले जाणारे बदाम का खावेत? असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडत आहे. यामुळे बाजारातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. त्यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.