औरंगाबाद : औरंगाबादमध्ये युतीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि उद्धव ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून माघार घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माघार घेत युतीसाठी लढू, जास्तीत जास्त जागा जिंकू, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही असे खोतकर यांनी म्हटले आहे. दानवेंच्या उमेदवारीला खोतकरांनी पाठिंबा दिला आहे. खूप कालावधी ताणल्यानंतर अर्जुन खोतकरांनी ही भूमिका घेतली आहे. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून संतप्त आहेत. ही जागा शिवसेनेकडेच यावी यासाठी कार्यकर्ते, स्थानिक नेते, अर्जुन खोतकर आग्रही होते. आज भाजपाची यादी जाहीर होणार आहे. या यादीत रावसाबेह दानवे यांचे नाव असणार आहे. यादी जाहीर होण्याआधीच अर्जुन खोतकर यांनी माघाराची भूमिका घ्यावी यासाठी भाजपा आग्रही होते. परंतु मी तुमच्या शब्दाबाहेर नसल्याचे सांगत खोतकर यांनी अखेर माघार घेतली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील असे म्हटले जात आहे.


लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी दानवेंचा लोकसभेसाठीचा मार्ग सुकर झाला आहे. जालना लोकसभा शिवसेनेने लढवली पाहिजे यासाठी काल अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटले होते. जालन्यातून लढण्यासाठी अर्जुन खोतकर ठाम होते. त्यामुळे दानवेंचा मार्ग सुकर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याने दानवेंचा मार्ग सुकर झाला आहे.