लष्कर भरतीचा मेसेज व्हायरल झाला आणि...
हल्ली सोशल मीडियामुळे आपण एकमेकांशी पटकन कनेक्ट झालोय. कोणतीही गोष्ट सहज सोपी उपलब्ध होते. मात्र त्याचबरोबर या सोशल मीडियावर एखादी गोष्ट सहज व्हायरल होती.
नाशिक : हल्ली सोशल मीडियामुळे आपण एकमेकांशी पटकन कनेक्ट झालोय. कोणतीही गोष्ट सहज सोपी उपलब्ध होते. मात्र त्याचबरोबर या सोशल मीडियावर एखादी गोष्ट सहज व्हायरल होते. अनेकदा व्हायरल झालेल्या गोष्टींचा खरेखोटेपणा न तपासता ती पुढे फॉरवर्ड केली जाते आणि त्याचा मोठा फटकाही बसतो.
अशीच काहीशी घटना नाशिकमधल्या देवळालीत घडलीये. नाशिकमधल्या देवळाली कॅम्पमध्ये लष्करी भरतीची अफवा पसरली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर याबाबतचा मेसेज व्हायरल झाला. त्यामुळे हा मेसेज वाचून शेकडो तरुणांनी देवळाली कॅम्पमध्ये धाव घेतली.
क्षणोक्षणी लष्करी भरतीसाठी देवळाली कॅम्पमध्येय दाखल होणा-या इच्छुक तरुणांची गर्दी वाढतच होती. व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये लष्कर भर्तीसाठीची पात्रता, शारिरिक पात्रता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या व्हायरल झालेल्या मेसेजवर विश्वास ठेवून हजारोंच्या संख्येने तरुणांनी देवळाली कॅम्प परिसरात गर्दी केली.
त्यामुळे अखेर अशा प्रकारे कुठलीही भरती होत नसल्याचा खुलासा लष्कराला करावा लागला. त्यानंतर इथली गर्दी आटली. त्यामुळे सोशल मीडियावरच्या कुठल्याही व्हायरल मेसेजवर डोळे झाकून विश्वास न ठेवता, सर्वात आधी खातरजमा करण्याचं आवाहन झी मीडिया करत आहे.