डेटींग ऍपचा वापर करून लुटमार करणाऱ्या तरुणीला अटक
लाखो रुपयांचा माल पोलिसांनी केला जप्त
पिंपरी चिंचवड : डेटींग अपचा वापर करून लुटमार करणाऱ्या तरुणीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. शिखा उर्फ देवेंद्र काळे असं आरोपीचं नाव आहे. आरोपीनं एका डेटींग ऍपवर फेक प्रोफाईल तयार करून अनेकांना लुटल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत या तरुणीनं पिंपरी चिंचवडमधील 16 जणांना लाखांना गंडा घातला आहे. यात काही महिलांचाही समावेश असल्याचं समोर आलंय
बंबल डेटिंग ऍप वर स्वतःचे नकली प्रोफाइल तयार करून पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल १६ जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. शिखा उर्फ देवेंद्र काळे या २७ वर्षीय तरुणीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. वाकड मध्ये एका चेन्नईहुन आलेल्या व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने आणि पैसे लुटल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याच पद्धतीने देहूरोड मध्ये ही १ लाख ८५ हजार रुपयांचा सोने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती.
दोन्ही घटना सारख्या वाटल्याने पोलिसांनी बंबल डेटिंग ऍप वर खोटी प्रोफाइल बनवत तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. अखेर तिच्याच जाळ्यात तीला अडकवत पोलिसांनी तीला अटक केली. पोलिस तपासात तीने तब्बल १६ जणांना गंडा घातल्याचे निष्पन्न झालंय. त्यापैकी केवळ ४ गुन्हे दाखल आहेत.
ज्यांना या महिलेने गंडा घातल्या त्यांनी तक्रार द्यायला पुढे यावे असं आवाहन पोलिसांनी केलंय. या तरुणीने काही तरुणींना ही फसवलंय. विशेष म्हणजे तीने तरुणींशी शारीरिक संबंध ठेवत त्यांना ही फसवल्याचे पुढं आलंय. एक वेबसिरीज पाहून तीला हे सुचल्याचे पोलिसांनी सांगितले.