प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : वृक्षतोडीसाठीच्या मालकी हक्क दाखल्यासाठी ६ हजारांची लाच घेताना कणकवली तहसीलदार संजय पावसकर आणि २ हजारांची लाच घेताना महसूल लिपिक निलेश कदम या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. तहसीलदार दालन आणि महसूल लिपिक निलेश कदम यांच्या कामाच्या ठिकाणी ही कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कणकवली तालुक्याचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या तहसीलदारांनाच लाच घेताना पकडल्यामुळे सिंधदुर्ग जिल्हा महसूल विभागात खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा तहसीलदाराला लाचलुचपत खात्याने पकडले आहे. यापूर्वी दोडामार्ग तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्यावर लाचलुचपतने करवाई केली होती. कणकवली शहरातील लाकूड व्यावसायिक असलेल्या फिर्यादी ने आपल्या वृक्षतोडीसाठी मालकी दाखला मिळण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. 


मात्र यासाठी तहसीलदार संजय पावसकर आणि महसूल लिपिक निलेश कदम यांनी फिर्यादीकडे लाच मागितली होती. याबाबत  फिर्यादी लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीची खात्री केल्यानंतर आज कणकवली तहसील कार्यालयात सापळा रचून रंगेहाथ पकडले.