मुंबई / औरंगाबाद : राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला पुराचा वेढा आहे. पुराचा कहर झाल्याने संपूर्ण शेतीसह घरेही पाण्याखाली गेली आहेत. येथे ओला दुष्काळ दिसून येत आहे. तर शेजारच्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. या कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद विमानतळावरून आज विशेष विमान उडणार आहे. हे विमान ढगांना हेरणार आहे. त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु होईल.


मागील वर्षी २५० कोटी खर्चून सोलापूर येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. सोलापूर, सांगली जिल्ह्यातील माणदेश हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा, उस्मानाबाद, लातूर आणि शेजारच्या कर्नाटकातील बीदर या पर्जन्यछायेतील प्रदेशाला याचा लाभ होईल, असा दावा त्यावेळी केला गेला होता.  


कृत्रिम पावसाचा मोठा धोका


- कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणार सिल्व्हर आयोडाइड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. 


- शेतजमिनीत आणि मातीत सिल्व्हर आयोडाइड हे रसायन मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होऊन पिकांसाठीदेखील घातक ठरते.


- आयोडाइड या रसायनाचा शेती नापीक होण्यास जास्त परिणाम होतो. 


- सिल्व्हर आयोडाइड हे विषारी असल्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे.


- विमानाने कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर काळात करणे अतिशय धोकादायक असते. 


- भारतात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगात गरम ढग आणि थंड ढग अथवा ढगांचा भाग असे वर्गीकरण न करता सऱ्हास एकाच प्रकारचे रसायन फवारले जाते. परिणामी नैसर्गिक ढग वाढण्याऐवजी ते नष्ट होऊन पडणारा नैसर्गिक पाऊसदेखील पडत नाही. त्यामुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.