नागपूर: मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी अव्वल आला आहे. डॅडीने महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचाराचा अभ्यास करत या परीक्षेत ८० पैकी ७४ गुण मिळवत चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.


परीक्षेत कारागृहातील १६० कैदी बसले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहयोग ट्रस्ट सर्वोद्यय आश्रम नागपूर, आणि मुंबई सर्वोद्यय आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कारागृहातील कैद्यांसाठी  गांधी विचार परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कारागृहातील १६० कैदी बसले होते. त्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तकं पुरविण्यात आली. नागपूरच्या कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीनंही परीक्षा दिली. त्याला पुरविलेल्या साहित्यातून गांधीजींचे विचार आत्मसात करताना परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.


गवळीची मोठी दहशत


अरुण गवळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याची मोठी दहशत आहे. तर गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत. गांधी विचारांची परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे.  मात्र आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचारांशी जुळला.