`मुंबईतल्या खड्ड्यात नाचणारी....`; पुण्यातल्या पावसावरुन अरविंद सावतांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते
मुंबई : सोमवारी पुण्यात (Pune) मुसळधार पावसाने (Rain) धुमाकूळ घातला. पुणे शहरात सोमवारी रात्री गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस पडला आहे. तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगामुळे हा पाऊस झाल्याची माहिती समोर आली. पुण्याच्या (Pune Rain) मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर 105 मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पु्णेकरांना मात्र या पावसामुळे नाहक त्रास सहन करावा लागलाय. अशातच विरोधकांनी पुणे महापालिका सत्ता असलेल्या भाजपवर जोरदार टीका केली होती. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावरुन आता शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी खोचक शब्दात टीका केलीय. (Arvind Sawant reply to Devendra Fadnavis on the rains in Pune)
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)?
पुणे शहर आणि परिसरामध्ये सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास शहराच्या आकाशात अकरा किलोमीटर उंचीचे प्रचंड मोठे ढग निर्माण झाले. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आणि अनेक नागरिक रात्री रस्त्यावर विविध ठिकाणी अडकून पडले. मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने महापालिकेच्या कारभारवार टीका करण्यात येत होती. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही' असं विधान केले होते.
"पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. काल पुण्यात पडलेल्या पावसाने मागील 10 वर्षांचा विक्रम मोडला आहे. मागील 24 तासात पुण्यात पडलेला पाऊस सर्वाधिक आहे. हे प्रमाण 100 वर्षांच्या रेकॉर्डपेक्षा थोडा कमी आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची टीका
राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत बोलताना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. "पुण्यात पडलेल्या पावसावर उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं, पाऊस काय आमच्या कंट्रोलमध्ये असतो का? मग मुंबईत पाऊस कुणाच्या कंट्रोलमध्ये असतो? तेव्हा तमाशा का करता? ती नाची आता कुठे आहेत, ते सध्या मी शोधतोय. मुंबईतल्या खड्ड्यात नाचणारी नाची पुण्यात कशी गेली नाहीत? नागपूरला का नाचायला गेली नाहीत? पावसामुळे निर्माण होणाऱ्या अशा मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे," असं अरविंद सावंत म्हणाले.