नवी दिल्ली : राज्यात शिवसेना भाजपातील संबंध अधिक ताणताना दिसत आहेत. सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपाने सांगत शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टाकला. त्यानंतर शिवसेनेने सुत्र हलविण्यास सुरुवात केली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे अशी राष्ट्रवादीची अट होती. या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते अरविंद सावंत हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर पडली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. अरविंद सावंत यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.



शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सावंत हे सकाळी ११.०० वा. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत. शिवसेना आमदार, नेते यांची काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर अरविंद सावंत यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले. आज शिवसेना नेते संजय राऊत हे दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 



शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं ?


शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊन काँग्रेसचा बाहेरुन पाठींबा घेऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. असे झाल्यास शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद तसेच गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी असतील असे ठरल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी असू शकते. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत या फॉर्मुलावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.