Ulhasnagar Crime News : थर्टी फर्स्टला अवघे काही दिवस शिल्लक असताना पोलीस आणि महापालिकेकडून उल्हासनगरात एक मोठी कारवाई केली आहे. शहरातील वादग्रस्त चांदनी ,अँपल आणि नाईन टी डान्स बार अखेर सील करण्यात आले आहेत. या बारवर आता पर्यंत तब्बल 80 वेळा कारवाई करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगरच्या श्रीराम चौक आणि  17  सेक्शन चौकात चांदनी, अँपल आणि नाईट टी नावाचा हे डान्स बार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. कोरोनाच्या काळातही सरकारी नियम न पाळता बिनधास्तपणे या बारमध्ये छमछम सुरू होती. या बारमध्ये आजवर अनेकदा स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं धाड टाकली होती आणि येथे सुरु असलेल्या अश्लील नृत्याचा भांडाफोड केला होता. 


इतकंच नव्हे, तर आजवर या डान्स बारवर तब्बल 80 वेळा पोलीस आणि महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही या बारच्या लीला काही कमी होत नव्हत्या. या बारमध्ये बिनधास्तपणे छमछम सुरु होती. त्यामुळे उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी ,मध्यवर्ती पोलिसांनी थेट हा बार सील करण्याचा गोपनीय अहवाल उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना पाठवला होता. त्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या पथकानं ऐन थर्टी फर्स्टच्या काही दिवस शिल्लक असताना या बारला सील ठोकलं आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या डान्सबार लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे.उल्हासनगर शहरात एकूण 12 ते 15 डान्सबार आहेत. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त डान्सबार हे एकट्या विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.


ठेकेदाराच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला


जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील धनाजी काळे नगरात राहणारे मक्तेदार विशाल वाघ यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात 5/6 हल्लेखोरांनी हल्ला केला. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत दोन तलवारी आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला केला. दरम्यान, विशाल वाघ व त्यांचे भाऊ घरी नसल्याने कुटुंबीयांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले होते. कुटुंबातील सदस्यांनी हिंमत करत शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असून याबाबत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. हल्लेखोरांनी शहरात आणखी दोन तरुणांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण थरारक प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. जळगाव शहरात टोळक्यांची गुंडगिरी वाढताना दिसत आहे. अनेक महिन्यापासून जिल्ह्यासह शहरात प्रकार वाढत असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.