Ashadhi Ekadashi 2024 :  आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात 5 हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले होते. एसटी महामंडळावर पांडुरंगाची कृपा झाली आहे. या मार्गावर वर्षभरात होणार नाही इतकी कमाई 8 दिवसात केली आहे. एसटी महामंडळाने आषाढी वारीच्या आठ दिवसात जवळपास 29 कोटींची कमाई केली आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी यात्रेत 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास केला आहे. आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 09 लाख 53 हजार  भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून 28 कोटी 92 लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.


यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 
प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल असा विश्वास एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे


विठोबाच्या तिजोरीत भक्तांचे भरभरुन दान


आषाढी यात्रेत भाविकांनी विठोबाच्या खजिन्यात दिले भरभरून दान केले आहे.  यंदाच्या आषाढी मध्ये विठोबाच्या तिजोरीत  8 कोटी 34 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे.  गत वर्षी पेक्षा 2 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.  पद स्पर्श आणि मुख दर्शन रांगेतून 10 लाख 88 हजार 527 भाविकांनी दर्शन  घेतले.