Ashadi Ekadashi 2022 : विठुराया- रखुमाई मातेची श्रीमंती पाहून व्हाल अवाक् ; दागिने असे, ज्यांची नावंही ऐकली नसतील
यंदाच्या आषाढीला विठ्ठल रखुमाईला तब्बल 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे मुकुट कोण करणार अर्पण, पाहा...
Ashadi Ekadashi : घरदार, जमीन जुमला... आपली माणसं सर्वकाही मागे सोडत पंढरीच्या वाटेवर निघालेले वारकरी आता आपल्या पृथ्वीवरील वैकुंठात पोहोचले आहेत. इथे आता त्यांना आस लागून राहिली आहे ती म्हणजे विठुरायाच्या भेटीची. वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जाणार त्याआधीच आम्ही तुम्हाला या लाडक्या पंढरीच्या अधिपती असणाऱ्या विठ्ठलाची भेट घडवणार आहोत. (ashadi ekadashi 2022 vitthal rakhumai jwellery will make you speechless)
यंदाची आषाढी अनेक कारणांनी खास आहे. नियमांचे पाश इथं कुठेच नसणार आहेत. विठुरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सध्या प्रत्येकजण आसुसलेला आहे, त्याच्या चरणी सेवा देण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरु आहेत. अशीच सेवा देत आहेत नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजी नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार.
विठ्ठल रखुमाईसाठी त्यांनी 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे मुकुट बनवले आहेत. आषाढी एकादशीला उत्तरवार कुटुंब पंढरपुरात जाऊन हे मुकुट अर्पण करणार आहेत.
विठ्ठल रखुमाईचे दागिने 700 वर्षांपूर्वीचे
गेल्या 700 वर्षांपूर्वीपासून भक्त आणि राजेरजवाड्यांनी विठ्ठल-रखुमाईला अर्पण केलेले दागिने जपून ठेवण्यात आले आहेत. या प्रत्येक दागिन्यामागे एक रंजक गोष्टही आहे. अमुक एक दागिना कधी घालावा याचीही प्रचंड काळजी घेण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस यांनी अनेकदा श्री विठ्ठल-रुक्मिणीला हे मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत.
पांडुरंगाचे दागिने
विटेवरी उभ्या असणाऱ्या पंढरीरायासाठी सोन्याचे पैंजण, तोडे आहेत. सोन्याचं सोवळंही (धोतर) आहे. कमरेला अमूल्य असा हिऱ्यांचा कंबरपट्टा आहे. तो नरहरी सोनारांनी घडवला आहे असं सांगण्यात येतं. हातामध्ये तोडे, बाजुबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी आहे. गळ्यामध्ये सोन्याची तुळशीची पंचेचाळीस पाने असलेली सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ आहे.
20 ते 25 पाचूंनी मढवलेला, मीनाकाम केलेला लहानमोठ्या सात फुलांचा लफ्फा आहे. देवाची ओळख ज्या कौस्तुभमण्यामुळे होते तो पाचूंनी मढवलेला, गोल नक्षी असलेला कौस्तुभमणी आहे. तो गळ्यालगत घालतात. बाजीराव पेशव्यांनी अर्पण केलेली हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी आहे.
बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा असे गळ्यात घालायचे दागिने आहेत. मोहरांवर उर्दू आणि मोडी लिपीतील अक्षरे आहेत. मोरमंडोळी नावाचा दागिना आहे. त्यात पाचू, हिरे आणि अतिशय मौल्यवान माणिक बसवलेला आहे. नवरत्नांचा हार आहे. त्यात मोती, हिरे, पाचू, पुष्कराज अशी नऊ रत्ने बसवलेली आहेत. पाचूचा पानड्यांचा हार आहे.
सोन्याच्या मुकुटांची संख्याही कमी नाही
पांडुरंगाच्या शिरस्थानी असणाऱ्या मुकुटांची संख्याही जास्त आहे. मुकुंटांची एकूण संख्या सहा सोन्याचे मुकुट आहेत आणि तीन-चार चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले मुकुट आहेत. सगळ्या मुकुटांत अमूल्य असा हिऱ्यांचा मुकुट आहे. त्याला सूर्यकिरणांचा मुकुट म्हणतात.
यामध्ये सोन्याची शिंदेशाही पगडीही आहे. पाडव्याला चांदीची काठी, खांद्यावर घोंगडी, धोतर, पगडी असा विठ्ठलाचा पोशाख असतो. पगडीवर बसवण्यासाठी रत्नजडित शिरपेच आहेत. अतिशय पुरातन आणि मौल्यवान पाचू, हिऱ्यांनी मढवलेले आहेत. सोन्या-मोत्यांचे तुरे आहेत. देवाची ओळख ज्या मकरकुंडलांमुळे होते ती कानात घालण्याची सोन्याची मकरकुंडले आहेत. यामध्ये माणिक आणि पाचू जडवलेले आहेत. कपाळावर किमती नील आणि हिरे बसवलेला नाम म्हणजे सोन्याचा गंध आहे.
श्री रखुमाई मातेचे दागिने
साक्षात श्री लक्ष्मीचा अवतार असणाऱ्या रुक्मिणी मातेला अनेक सुंदर, अमूल्य दागिने आधीपासून घालण्यात येता. पायात सोन्याचे वाळे, पैंजण आहेत. सोन्याची साडी आहे. दोन कंबरपट्टे आहेत. एक सोन्याचा आहे. दुसरा माजपट्टा आहे. हा वेगळ्या प्रकारचा कंबरपट्टा आहे. त्याला बसवण्यासाठी किल्ली आहे.
रत्नजडित पेट्या आहेत. त्या हिरे, माणिक, पाचू अशा रत्नांनी मढवलेल्या आहेत. हातामध्ये पाटल्या, मोत्यांच्या, रत्नजडित जडावांच्या बांगड्या गोठ, तोडे आहेत. तोडे शिंदेशाही पद्धतीचे आहेत. हातसर आहेत. त्यामध्ये हिरे, माणिक, पाचू जडवले आहेत. चटईची वीण असलेल्या वाक्या आहेत.
माणिक, पाचू जडवलेले बाजुबंद आहेत. गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार,चपलाहार, पेट्यांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल असे दागिने आहेत.
नथीही तितक्याच सुरेख
रखुमाईसाठी नाकामध्ये घालायच्या तीन नथी आहेत. एक मोठी मोत्यांची नथ, दुसरी हिऱ्याची नथ आणि तिसरी आणखी एक मोत्याची नथ. एक मोत्याची नथ शेजारती करताना घालतात. याशिवाय मारवाडी पद्धतीची नथदेखील आहे. नवरात्रीमध्ये द्वितीयेला रुक्मिणीला मारवाडी लमाणी पद्धतीचा पोशाख करतात. त्या वेळी ही नथ आणि झेला म्हणून एक दागिना आहे तो घातला जातो.
या दागिन्यांच्या पदकामध्ये सोन्याचं कान कोरणं, दातकोरणं आहे. हे लमाणी पद्धतीचे दागिने वर्षांतून फक्त एकदा- नवरात्रीत द्वितीयेला घातले जातात. रुक्मिणी मातेला भांगेत घालण्यासाठी सोन्याचा रत्नजडित बिंदी बिजवरा आहे. पेट्यांची बिंदी आहे. डोक्यात घालण्यासाठी रत्नजडित हिऱ्याची वेणी आहे. तिला मुद्राखडी म्हणतात.
रुक्मिणी मातेला चार प्रकारचे सोन्याचे मुकुट आहेत. एक जडावाचा, दुसरा शिरपेच आणि तिसरा नुसता सोन्याचा मुकुट आहे. चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले दोन मुकुट आहेत. सोन्याचा चौथा खूप जुना मुकुट आहे तो आता जीर्ण झाला आहे. त्याला परबाचा मुकुट म्हणतात. कपाळावर लावण्यासाठी सोन्याची जडावाची चंद्रकोर आहे. तिला चंद्रिका म्हणतात. तसेच सोन्याचे रत्नजडित सूर्य आणि चंद्र आहेत. याशिवाय मातेला मोठे चांदीचे दोन आणि सोन्याचा एक करंडा आहे. महत्त्वाचे सण, महालक्ष्मीचे तीन दिवस, नवरात्र, या दिवशी मातेची निरनिराळ्या पद्धतीचे पोशाख व दागिने घालून पूजा केली जाते. नवरात्रीत ललितापंचमीला पूर्ण फुलांचा पोशाख केला जातो. अष्टमीला पांढरी रेशमी साडी आणि पूर्ण मोत्यांचे दागिने घालतात.