मुंबई, पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. दरम्यान, कोविड -१९ च्या साथीमुळे प्रमुख संस्थानच्या पादुकांना पंढरपूरला जाण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. पादुकांसोबत २० जणांना जाण्याची मुभा देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात आज ३० जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने सोमवारी पत्रकार परिषदेत केले. 


फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते, विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. संपूर्ण जगावर आलेले हे संकट दूर व्हाव म्हणून विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहे. दरम्यान, प्रथेप्रमाणे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, जिल्हा पालकमंत्र्यांचे कुटुंब, मंदिर समिती आणि सल्लागार समिती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पूजा करतील आणि जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे त्यावेळी उपस्थित असतील. ज्यांना पंढरपुरातून दुस-या गावात जायचे आहे, त्यांनी इतर मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथे आज रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर इथल्या पादुकांचा यात समावेश आहे.