मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना त्यांच्या जुन्या मित्राची आठवण येते आहे. अशोक चव्हाण आणि विखे पाटील हे याआधी एकाच पक्षात होते. पण राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यात चव्हाणांना मंत्रिपद मिळालं, खातेवाटप झालं पण आता मौसम दोस्तीचा आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही आठवण येण्यामागे एक कारणही आहे. खातेवाटपानंतर सगळ्याच पक्षात थोडीफार धुसफूस आहे. तशी ती काँग्रेसमध्येही आहे. सद्यपरिस्थितीत काँग्रेसमधल्या खातेवाटपावर थोरात गटांचं वर्चस्व दिसतं आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या दिल्ली वाऱ्यांमध्ये थोरातांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी चांगली गट्टी जमवली. माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण मात्र त्यामुळे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाणांना महसूल खातं हवं होतं, पण सार्वजनिक बांधकाम दिलं गेलं, त्यामुळे चव्हाण समर्थक मंत्रीही नाराज असल्याची चर्चा आहे.


दुसरीकडे बाळासाहेब थोरातांना मात्र प्रदेशाध्यक्षपद आणि महसूल मंत्रिपद अशी डबल लॉटरी लागली. अशा वेळी स्वतःचं वजन वाढवण्यासाठी अशोक चव्हाणांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच अशोक चव्हाणांना राधाकृष्ण विखे पाटलांची प्रकर्षानं आठवण येते आहे. तिकडे मंत्रिपद गेलं, विरोधी पक्षनेतेपद गेलं हाती राहिली फक्त आमदारकी, अशी विखेंचीही स्थिती आहे. त्यामुळे हीच ती वेळ जुन्या दोस्तांची आठवण येण्याची.