`वंचित` भाजपची `बी टीम` आरोपावर, अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीही भाजपाची `बी टीम` असल्याची टीका केली होती.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. याच वेळेस काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीही भाजपाची 'बी टीम' असल्याची टीका केली होती. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की ' आम्ही भाजपची बी टीम आहोत, हे सिद्ध करा आणि माफी मागा...त्यानंतरच आम्ही विधानसभेबाबत चर्चा करू.' आता प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सवाल केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल
लोकसभेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे आमच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. 'निवडणुकीच्या रिंगणात विरोधात असलेल्या उमेदवाराची प्रशंसा करणे अपेक्षित असते का?', असा सवाल यावेळी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. संयुक्त परिषद बोलताना थोरात म्हणाले की 'आरोप प्रत्यारोपानंतर वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत यायचे की नाही, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे.'
'धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, ही भूमिका आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. काँग्रेस संघटनेत राज्यस्तरावर मोठे बदल होणार नाहीत, मात्र काही दुरूस्त्या कराव्या लागतील आणि त्या दुरूस्त्या दोन्ही पक्ष मिळून करतील,' असे देखील थोरात यांनी म्हटलं आहे.