भाजपने तगडा उमेदवार दिल्याने अखेर अशोक चव्हाण नांदेडमधून लोकसभेच्या रिंगणात
भाजपने तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे अशोक चव्हाण यांचा लढाईत जातीने उतरण्याचा निर्णय
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण यांचे नाव जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांच्या सात याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये चव्हाणांचे नाव नसल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे नांदेडमधून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपकडून शनिवारी नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसनेही लगेचच अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.
यापूर्वी शिवसेनेत असलेले प्रतापराव चिखलीकर लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शनिवारी भाजपने तिकीट दिल्यावर विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला. चिखलीकर हे अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक मानले जातात. आगामी निवडणुकीत ते चव्हाण विरोधकांची मोट बांधू शकतील, अशी भाजपला अपेक्षा आहे. भाजपने तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे अशोक चव्हाण यांनीही जातीने लढाईत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात केवळ नांदेड आणि हिंगोली या दोन मतदारसंघातच काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे आता प्रतापराव चिखलीकर चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिखलीकर यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने चव्हाण यांना मतदारसंघात अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. अशोक चव्हाण यांना नांदेडमध्येच गुंतवून ठेवण्यासाठी भाजप नेतृत्त्वाने चिखलीकरांना येथून उमेदवारी दिल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपमध्ये गेल्याने प्रतापरावर चिखलीकर यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र, चिखलीकरांच्या मातोश्री वारीनंतर ही नाराजी दूर झाली. माणूस मोठा आहे म्हणून निवडणूक मोठी होत नाही. भाजपने केलेल्या विकासकामांच्या जोरावर मी निवडून येईन, असा दावा चिखलीकर यांनी केला.