मूकबधीर अश्विनी पाडावेचं दहावीत घवघवीत यश
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधल्या अश्विनी पाडावेचं आयुष्य म्हणजे लहानपणापासूनच संकटांची जणू मालिका. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही अश्विनी जिद्दीनं लढत राहिली. याच जिद्दीच्या जोरावर अश्विनिनं दहावीत ९१ पॉईंट ४० टक्के गुण मिळवलेत.
पिंपरी चिंचवडच्या बिजली नगरमधल्या या १० बाय १० च्या खोलीत आनंदाला जणू वाचा फुटलीय. या खोलीनं शशिकला पाडावे आणि त्यांच्या दोन मुलींचा प्रतिकूल परिस्थितीबरोबरचा संघर्ष पाहिलाय. शशिकला यांची धाकटी लेक अश्विनीने दहावीत ९१ पॉईंट ४० टक्के गुण मिळवलेत. मुकबधीर आईच्या या मुकबधीर मुलीचं यश पुरेसं बोलकं आहे. या मुलींच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर शशिकला यांना चाकणमधल्या एका कंपनीत हेल्पर म्हणून काम मिळालं. महिना ७ हजारांच्या तुटपुंज्या मिळकतीतही त्यांनी दोन्ही मुलींना शिकवलं. आणि अश्विनीनं कोणताही क्लास नसतानाही, दहावीत ९१ पॉईंट ४० टक्के गुण मिळवत आईच्या कष्टांचं चीज केलं. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अश्विनीला पुढच्या महागड्या शिक्षणाची चिंता सतावतेय.
एरवी दोन माणसं आली तर बसायला जागा नसणाऱ्या या छोट्या घरात, आता आनंद ओसंडून वाहतोय. दहावीचा टप्पा तर पार पडलाय. डॉक्टर होण्याचं स्वप्न अश्विनीच्या डोळ्यात तरळतंय. तिच्या या संघर्षाला हवी आहे समाजाची साथ.