रोहित पवारांचा सुजय विखे पाटलांवर निशाणा
जनतेला आता आमदार पाहीजे असेही रोहित यांनी स्पष्ट केले.
नाशिक : सुजय विखेंनी वैयक्तिक टिका करू नये. त्यांनी इथल्या कामाबद्दल बोलाव असे आवाहन कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहीत पवार यांनी केले. राम शिंदे बाजूला राहिले आता रोहीत पवार विरूद्ध सुजय विखे अशी निवडणूक का होतेय ? या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. सुजय यांची निवडणूक झाली आहे. ही आमदारकीची निवडणूक असून जनतेला आता आमदार पाहीजे असेही रोहित यांनी स्पष्ट केले.
राम शिंदे सक्षम असताना सुजय विखेंना पुढे का केलं जातंय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राम शिंदेंना सुजय विखेंची मदत घ्यावी लागतेय.
लोकसभेला राम शिंदेंनी स्वत:ला प्रोजेक्ट केलं होतं तेंव्हा सुजय आणि राम शिंदे संबंध तणावले होते. आता राम शिंदेंना सुजय विखेंची गरज म्हणूनच ‘गोडवा’ निर्माण केला जातोय असा टोलाही रोहित यांनी लगावला आहे.
सध्या जातीपातीचं राजकारण सुरू केलं आहे. मराठा - ओबीसी असं करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु जनतेला सगळं माहित असल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले. मतदारांना आमिष दाखवले गेले. रस्ता तयार केला नाही तर पैसा गेला कुठे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुकडी धरणातून लोकांना हक्काचं पाणी आणता येईल. कोणावरही अन्याय होणार नाही. या संदर्भात भाजपा वाद निर्माण करत असल्याचीह टीकाही रोहित पवार यांनी यावेळी केली.