भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के, विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये `अशी` बदलली समीकरणं
Ashok Chavan Nanded Politics: विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात अशोक चव्हाण यांना लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत.
Ashok Chavan Nanded Politics: लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना आगामी विधानसभा निवडणूकीआधीच धोक्याची घंटी मिळू लागल्याची चिन्ह दिसत आहेत. अशोक चव्हाण यांचे होमग्राऊंड असलेल्या नांदेडमध्ये भाजपला मोठा विजय मिळवून देऊ असा विश्वास अशोक चव्हाण यांना आहे. पण विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात अशोक चव्हाण यांना लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
मित्राने सोडली अशोक चव्हाणांची साथ
लोकसभेनंतर बदलेल्या समीकरणामुळे अशोक चव्हाण यांची साथ देणारे अनेकजण आता त्यांची साथ सोडत आहेत. अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. अशोक चव्हाण यांचे महाविद्यालयीन मित्र माजी राज्यमंत्री डी. पी सावंत यांनी देखील अशोक चव्हाण यांची साथ सोडली. डी. पी. सावंत हे काँगेस कडून दोनवेळा आमदार आणि एकवेळ राज्यमंत्री होते. लोकसभेत प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. मात्र त्यांनतर आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून कोणासोबत जायचे हा निर्णय करू अशी प्रतिक्रिया सावंत यांनी 'झी 24 तास'ला दिली होती.
काँगेसकडे मागितली उमेदवारी
आता डी पी सावंत यांनी नांदेड उत्तर मधून काँगेसकडे उमेदवारी मागितली असून जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता एकएक जन त्यांच्यापासून दूर होत आहे. भाजपमध्ये गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून थेट उमेदवारीच मागितली आहे. दरम्यान मी काँग्रेसमध्येच होतो, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करील अशी प्रतिक्रिया डी. पी. सावंत यांनी दिली.
परिवारातूनही बंड
भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या परिवारातूनही बंड होताना दिसतंय. अशोक चव्हाण यांचे भाऊजी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपसोबत बंड करण्याचा इशारा दिला. दोन वेळा आम्हाला पक्षादेश म्हणून माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भुमिका आहे आणि ती भुमिका मला मान्य आहे असं मिलन खतगावकर म्हणाल्या. भाजपाने तिकीट दिलं नाही तरीही लढणार का असा प्रश्न विचारला असता , बीलकुल अस उत्तर मीनल खतगावकर यांनी दीले.
बंडाचा इशारा
डॉ मीनल खतगावकर या अशोक चव्हाण यांच्या भाचीसून आहेत. त्या 2019 साली विधानसभेसाठी तर 2024 साली नांदेड लोकसभेसाठी इच्छुक होत्या. लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता त्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदार संघातून इच्छुक आहेत. नायगाव मध्ये भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पवार आहेत. दरम्यान मीनल खतगावकर यांनी नुकताच कार्यकर्त्याचा मेळावा घेउन स्वतःची उमेदवारी जाहिर तर केलीच शिवाय पक्षाने संधी न दिल्यास बंड करण्याचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे सद्या जिल्हा भाजपाची सर्व सूत्र अशोक चव्हाण यांच्या हाती आहे. आणि त्यांच्याच भाचे सुनेने बंडाचा इशारा दिलाय. माजी मंत्री डी. पी. सावंत आणि इतरांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर आता मीनल खतगावकर यांनी बंडाचा इशारा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.