देशमुख बंधुंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रचारासाठी कुटुंब एकवटलं
बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव विधानसभा निवडणूक २०१९ च्या राजकीय आखाड्यात उतरले आहेत. लातूर शहर मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला.
यावेळी उमेदवार बंधूंच्या आई वैशालीताई देशमुख, काका माजीमंत्री दिलीपराव देशमुख, अमित यांच्या पत्नी अदिती देशमुख आणि धीरज यांच्या पत्नी दिपशिखा देशमुख यादेखील उपस्थित होत्या. तसंच बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली.
अर्ज दाखल केल्यानंतर देशमुख बंधुंनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. लातूरच्या गंजगोलाई ते टाऊन हॉलपर्यंत रॅली काढून मतदारांना साद घातली. प्रचारासाठीही सर्व देशमुख कुटुंब एकत्रितच दिसलं. त्यानंतर टाऊन हॉलच्या मैदानावर सभा घेऊन प्रचाराचा नारळ ही देशमुख बंधूंनी फोडला.
अमित देशमुख लातूर शहर हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य असलेले धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.