`अमेठीत शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणारे गांधी महाराष्ट्रात`
भाजपाचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचार सभेत स्मृती इराणी बोलत होत्या.
सांगली : अमेठीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणारे राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन मात्र शेतकऱ्यांच्या विषयी बोलतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. सांगली मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचार सभेत स्मृती इराणी बोलत होत्या.काँग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा आणि प्रगती अडवण्याचा प्रयत्न होत होता अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
देशाचे तुकडे करणारे आणि जाती आणि धर्माच्या नावावर भेदाभेद निर्माण करणाऱ्या विचारधारे विरोधात आमची लढाई असल्याचे ईराणी म्हणाल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. बंद पडलेल्या घडाळया (राष्ट्रवादी) विषयी काय बोलायच ? असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांवर निशाणा
नरेंद्र मोदी हे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. मोदी दिवसभर अदानी आणि अंबानी यांच्याविषयीच बोलत असतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य बँकांसमोर रांगेत उभे होते. त्या रांगांमध्ये अंबानी किंवा अदानींना तुम्ही पाहिलं का? तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहताय. आणखी सहा महिन्यांनी देशात मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी पाहायला मिळेल, अशी भीती यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
तरुणांना मूर्ख बनवण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. तसे करून फार काळ सरकार चालवता येऊ शकत नाही. तुम्ही सहा महिने किंवा एक वर्ष सरकार चालवू शकता. पण एक दिवस सत्य समोर येईलच. त्यानंतर देशात आणि नरेंद्र मोदींचं काय होतं ते तुम्ही पाहाल, असेही राहुल यांनी म्हटले.