नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ ३.७८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलीय. २०१४ मध्ये याच मालमत्तेची किंमत अवघी १ कोटी ८१ लाख रुपये होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमिनींच्या बाजारमुल्यात वाढ झाल्यामुळे तसंच आमदार वेतन वाढल्याने मालमत्तेची किंमत वाढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या मालमत्तेचं मूल्य ४२.६० लाख रुपयांवरून वाढून ते आता ९९ लाख ३० हजार रुपये इतकं झालं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही. मात्र चार खासगी तक्रारी विविध न्यायालयांमध्ये दाखल असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.


मुख्यमंत्र्यांकडे २०१४ साली ५० हजार रूपये रोख रक्कम होती. २०१९मध्ये हीच रोख रक्कम १७,५०० रुपये एवढी आहे. २०१४ साली मुख्यमंत्र्यांच्या बँकेतल्या ठेवी १,१९,६३० रुपये होत्या, यंदा त्यांच्या खात्यात ८,२९,६६५ रुपये जमा आहेत.