मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. भाजपा-शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरु आहे. असे असताना राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडीची प्रकरणे समोर येत आहेत. नंदुरबार, पुणे अशा काही ठिकाणी जागावाटपावरून आघाडीसमोर प्रश्न उभा राहीला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद उफाळलाय. काल कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फॉर्म्युला जाहीर करून टाकला होता. यात पुण्यातल्या ८ जागांपैकी ४ राष्ट्रवादी, ३ काँग्रेस आणि १ जागा मित्रपक्षाला सोडणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र काँग्रेसला हे वाटप मान्य नसल्याचं दुसऱ्याच दिवशी स्पष्ट केलंय. काँग्रेसला ४ जागा हव्या असून पर्वतीच्या जागेवरही शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दावा ठोकलाय. 



आघाडीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेची एकही जागा सोडली जात नसल्यानं नाराज राजेंद्र गावित यांनी पक्ष सोडण्याची धमकी पक्षाला दिली आहे. जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय गावित यांनी घेतला आहे. गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे भाऊ आहेत. कार्यर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  
राजेंद्र गावित हे शहादा तर त्यांचेच भाऊ शरद गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवापूर मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा सोडली जाणार नसल्याचं चित्र असल्यानं या दोन्ही भावांनी वेगळ्या मार्गानं जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतय. हे दोन्ही भाऊ पुढे कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हे अदयाप स्पष्ट झालेले नाही.