ठाणे : कळवा मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.  शरद पवारांच्या उपस्थितीमुळे  आव्हाडांना गहिवरून देखील आलं. मात्र या रॅलीला एवढा उशीर झाला की, आव्हाडांना आज आपला उमेदवारी अर्जच भरता आला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सरकारी कार्यालय बंद झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॅलीनंतर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते. शरद पवार उन्हातान्हात रॅलीत सहभागी झाल्याचा क्षण मोठा असल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. पवारांना त्रास दिलेल्यांना धडा शिकवणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.


आव्हाड यांचा अर्ज भरण्यासाठी कन्हैय्या कुमारही आला होता, पण काँग्रसचे स्थानिक नेते या रॅलीसाठी फिरकले नसल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली आहे.


दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध शिवसेनेनं अभिनेत्री दीपाली सैय्यदला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे. दीपाली सय्यद मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहे.