ठाणे : विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांचा सामना अभिनेत्री दीपाली सैय्यदबरोबर होणार आहे. निवडणूक फॉर्म भरायच्या एक दिवसआधी म्हणजेच काल रात्री उशीरा दीपाली सैय्यदनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दीपाली सैय्यदनी हातात शिवबंधन बांधलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळवा मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी जितेंद्र आव्हाड यांनी मात्र गाण्यातून दीपाली सैय्यद यांच्यावर निशाणा साधला आहे. 'निकालाच्या दिवशी घराघरात एकच गाणं वाजणार आहे. बाबूल की दुवाई लेती जा, जा तुजको सुखी संसार मिले, मायके की तुझे ना याद आये,' असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.


माहेरवाशीण म्हणून आलेल्या दीपाली सैय्यद यांचा दीड लाख मतांनी पराभव करु, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. दीपाली सैय्यद सध्या माहेरवाशीण आहेत. १५ दिवस लाड केल्यानंतर त्यांना परत घरी पाठवायचं आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.


कळवा मुंब्रा भागाचा विकास झाला नाही, असा आरोप दीपाली सैय्यदनी केला होता, या आरोपालाही आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दीपाली ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी विकासच करते, असा टोला ही आव्हाडनी लगावला आहे.