प्रशांत शर्मा, झी मीडिया, कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत पारंपरिक विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगतोय. या मतदार संघात चौरंगी लढत होतेय. यात प्रामुख्याने काळे विरुध्द कोल्हे तसेच वहाडणे आणि परजणे हे अपक्ष उमेदवार आपल नशीब आजमावत आहेत. कोपरगावातील लढाई गेली अनेक वर्ष काळे आणि कोल्हे या दोन घराण्यात झाली आहे. या बरोबरीने भाजपाचे जेष्ठ नेते सुर्यभान पाटील वहाडणे आणि नामदेवराव परजणे गटाचही प्रभुत्व राहीलय.  यंदा भाजपात असलेल्या कोल्हे कुटुंबियांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या दुसऱ्यांदा भाजपाच्या उमेदवार म्हणुन निवडणूक लढवतायत. तर त्यांच्या विरोधात काळे घराण्यातील तरुण आशुतोष काळे हे राष्ट्रवादीकडुन रिंगणात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोपरगावातून यंदा दुसऱ्यांदा आशुतोष काळे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. गेल्या पाच वर्षात तालुक्यात न झालेला विकास आणि शहराच्या पाणी पुरवठ्याचा वाढीव साठवण तलाव तसेच गोदावरी कालव्याच हक्काच पाणी शेतकऱ्यांना मिळाव हे मुद्दे घेत काळे मैदानात उतरलेत.


कोपरगाव मतदार संघात भाजपाशी एकनिष्ठ राहीलेल्या दिवंगत सुर्यभान पाटील वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी नगरपालिका निवडणुकांच्या वेळी पक्षाने तिकीट नाकारल्याने अपक्ष लढत नगराध्यक्ष पद पटकावले होते. त्यानंतर वहाडणे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष सुरु होता. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही वहाडणे भाजपाच्या उमेदवारा विरोधात अपक्ष म्हणुन निवडणूक लढवताय.


कोपरगाव मतदार संघातील तेरा गावे ही राधाकृष्ण विखे पाटलांच्या राहाता तालुक्यात आहेत तसेच कोपरगावच्या निवडणुकीत विखे यांची आणि त्यांची सासुरवाडी असलेल्या परजणे गटाची भुमिका महत्वाची राहीलीये. विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत. पाण्याचा प्रश्न त्यांच्याही प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे.


कोपरगाव शहरासह तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, गोदावरी कालव्यातुन मिळणाऱ्या पाण्यात होत जाणारी घट तसेच अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचा दावा करत निवडणुकीचा प्रचार रंगतोय. त्यामुळे मतदारराजा कोणाच्या पारड्यात मत देतो हे येत्या २४ तारखेलाच स्पष्ट होईल.