पंकजांच्या प्रचारासाठी बहीण प्रीतम मुंडेही हजर, फुलांची उधळण
पंकजा मुंडे यांच्या विधानसभा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये हा रोड शो करण्यात आला
बीड : भाजपा नेत्या आणि महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांची छोटी बहीण - खासदार प्रीतम मुंडे यांनीही रोड शो केला. बीड जिल्ह्यातल्या सावरगावमधल्या भगवानभक्त गडावर भाजपा अध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत मुंडे भगिनींनी जोरदार शक्तीप्रकर्शन केलं. यावेळी भाजपाच्या विधानसभेच्या प्रचाराचा अमित शाहांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असल्याची पावती अमित शाहांनी पंकजा मुंडेंना दिली. अमित शाहांनी प्रचाराच्या सुरूवातीला न विसरता ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ३७० विरोधात बोलणाऱ्यांना जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं. तर पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या. अमित शाहांचं ३७० तिरंगा झेड्यांनी सभास्थळी स्वागत करण्यात आलं. सभेच्या मंचावर बीड आणि अहमदनगरधील सर्व उमेदवार हजर होते.
पंकजा मुंडे यांच्या विधानसभा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये हा रोड शो करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. त्यांच्या समर्थकांची एकच गर्दी या रोड शोसाठी एकत्र जमली होती.
खासदार प्रितम मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मुली आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं काम त्या करत आहेत.