पुण्यात युतीमध्ये `हडपसर घ्या, इंदापूर द्या` चा तोडगा
युती असो वा आघाडी विधानसभेसाठीचं जागावाटप ही दोन्हीकडची डोकेदुखी
अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : पुण्यातील हडपसर मतदारसंघ जागा युतीच्या जागावाटपात कळीचा ठरत असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे आघाडीत देखील या जागेवरून ओढाताण सुरु आहे. पुण्यातील हडपसरसहीत आठही आमदार भाजपचे आहेत. अशा परिस्थितीत यावेळी किमान एखाद - दुसरी जागा आपल्या वाट्याला यावी यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यानुसार पक्षाची त्यातल्या त्यात बरी ताकद असलेल्या हडपसरवर सेनेनं दावा सांगितलाय. त्याचवेळी विद्यमान आमदार आपला असताना हडपसर सेनेला का म्हणून सोडायचं अशी भूमिका भाजपनं घेतलीय.
हे सगळं एका बाजूला सुरु असताना नुकतेच काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलेले इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची सोय भाजपाला लावावी लागणार आहे. त्यासाठी इंदापूर मतदारसंघ भाजपाकडे असायला हवा. मात्र २००९च्या सूत्रानुसार तो शिवसेनेकडे होता. अशा परिस्थितीत 'हडपसर घ्या, इंदापूर द्या' चा तोडगा दोन्ही पक्षांच्या दृष्टीपथात आहे. वेळप्रसंगी हडपसरवर पाणी सोडण्याची भाजपाकडे आणखीही काही कारणं असू शकतात.
ज्यामध्ये विद्यमान आमदारांवरील गैरव्यवहारांच्या आरोपांसह लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराचं घटलेलं मताधिक्य या बाबी विचारात घेतल्या जाण्याची शक्यताय. असं असलं तरी भाजपाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर उमेदवारीवर पाणी सोडण्याच्या अजिबातच तयारीत नाहीत. आपणच लढू आणि आपणच जिंकू असा त्यांचा दावा आहे.
भाजपा-सेनेत हडपसरवरून असा तिढा निर्माण झाला असताना आघाडीतही काही आलबेल नाही. हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचं अजित पवार यांनी आधीच जाहीर केलंय. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हा निर्णय मंजूर नाही. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी गरज पडल्यास मोर्चा काढण्याची तयारी इथल्या इच्छुकांनी चालवलीय.
तेव्हा युती असो वा आघाडी विधानसभेसाठीचं जागावाटप ही दोन्हीकडची डोकेदुखी आहे. ही प्रक्रिया जितकी सहजतेनं पार पडेल तितकं दोघांसाठी फायद्याचं आहे. मात्र जेव्हा प्रश्न इच्छुकांच्या मनसुब्यांचा येतो तेव्हा अशा तिढ्यातून मार्ग काढणं पक्षाच्या नेत्यांसमोर मोठं आव्हानांचं असतं.