श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : राज्याला दोन मुख्यमंत्री देणारे आणि तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणारे यवतमाळच्या पुसद येथील नाईक घराणे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार, माजी मंत्री व जेष्ठ नेते मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या दोन दिवसात कुटुंबियांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची ऑफर असल्याचा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुसद मतदार संघ हा नाईकांचा गढ असून मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक हे याआधीच भाजपाच्या गळाला लागले आहेत. भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्यत्व देखील बहाल केले. आता आगामी विधान सभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने इंद्रनील नाईक हे शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. इंद्रनील हे सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांचा पुसद मतदारसंघात प्रभाव आहे. मनोहर नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडतील का? किंवा राजकारणातून निवृत्ती घेत पुत्र इंद्रनील ला साथ देतील का? हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. 



मनोहर नाईक यांची पत्नी अनिता नाईक या पुसदच्या नगराध्यक्ष असून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती हे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात नाईक घराण्याचा वरचष्मा आहे. हा मतदारसंघ बंजारा बहुल असून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे बंजारा समाजासाठी दैवतासमान आहे. वसंतरावांचे पुतणे सुधाकर नाईक हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामिल झाले. 


वसंतराव नाईकांचे दुसरे पुतणे मनोहर नाईक यांनी आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद सांभाळले. त्यांच्या रूपानेच विदर्भात राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. पुसद मध्ये आजवर नाईक घराण्या व्यतिरिक्त कोणीही निवडून आलेला नाही. आता नाईक घराणंच राष्ट्रवादीची साथ सोडत असल्याने आघाडीसाठी हा मोठा धक्का असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जोरदार हादरा देणारा नाईकांचा हा निर्णय असणार आहे.


प्रवास 


५ डिसेंबर १९६३ रोजी वसंतरावांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या निवडणुकीनंतरही वसंतरावांना मुख्यमंत्रीपद लाभले. १९७७ ला ते लोकसभा निवडणूक जिंकले आणि पुसद विधानसभेमधून त्यांचे पुतणे सुधाकर नाईक १९७८ साली विजयी झाले.


१९८०, १९८५, १९९०, आणि १९९९ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. या काळात सुधाकरराव यांनी देखील २ वर्ष मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. सुधाकररावांना हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल बनविण्यात आल्यानंतर त्यांचे कनिष्ठ बंधू मनोहर नाईक १९९५ आणि २००१ च्या पोटनिवडणुकीत पुसद मधून निवडून आले. 


२००४ २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीतही मनोहर नाईक विजयश्री ठरले. ते आघाडी सरकारमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री होते, मनोहररावांचा मोठा मुलगा ययाती नाईक वारसदार म्हणून पुढे आला. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. 


नुकतेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुसदच्या उमेदवारीसाठी मुलाखत देखील दिली. मनोहर रावांचा कनिष्ठ मुलगा इंद्रनील देखील राजकारणात सक्रिय नसला तरी नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याने आपला प्रभाव पाडला आहे. एकंदरीतच पुसदची निवडणूक आणि नाईक घराण्याचा विजय असेच सूत्र राहिले आहे.