कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस होता. उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये पवारांनी राज्यातल्या तसंच केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'मला ८० वर्षांचा म्हातारा म्हणतात, पण मी काय म्हातारा झालोय का? अभी तो मै जवान हूं... जोपर्यंत भाजप आणि शिवसेनेचं सरकार घालवत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही,' असं शरद पवार म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्या जनतेने मला १४वेळा निवडून दिलं आहे. मला लोकांनी सर्व काही दिलं. आता माझी जबाबदारी चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही, ही आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.


यावर्षी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही, तरीही बँकांची वसुली सुरू आहे. काही ठिकाणी जप्तीही सुरु आहे. कांद्याला थोडा दर मिळाला, तर लगेच सरकारने कांदा निर्यात रोखली. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे यांना घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, अशी टीका पवारांनी केली.


पूरामध्ये ऊसाचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं. सरकारने संकटकाळात सगळी ताकद तिकडे लावायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. मुख्यमंत्री फक्त अर्धा तास सांगलीमध्ये थांबले. मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली, असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.