घोटी : सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. घोटी येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जनतेसमोर शिवसेनेची भुमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच शिवसेनेच्या तसेच महायुतीच्या आमदारांच्या क्षेत्राची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. यासाठी ते राज्यभर प्रचार सभा घेत आहेत. मला विरोधकांवर टीका करण्यात वेळ घालवायचा नाहीए तर माझे मुद्दे अधिक स्पष्टपणे आणायचे असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी सेनेला निवडून द्या. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये शेती खर्चसाठी देणार हे सेनेचे वचन आहे. हे स्वप्न माझे नाही तर तुमच्यासाठी तुमचे स्वप्न आहे. मी एकटा काही करू शकत नाही. त्यासाठी सेनेच्या सर्व आमदारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. 



मी स्वतः निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. मात्र महाराष्ट्र घडविण्यासाठी आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे. यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आदित्य म्हणाले. 


लोकांच्या मनातले दहा वर्षांत जाणले आहे. तुमच्या मनातले साकार करायचे आहे. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच वर्च्युल क्लासरूम, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी तीन हजार बसेस तसेच प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारायचे असल्याचे आश्वासन आदित्य यांनी यावेळी दिले.