`लक्ष्मी घड्याळाचे काटे बघून युवराजासोबत येत नाही तर कमळातून येईल`
स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपल्या खास शैलीतून कोपरखळ्या मारल्या.
मयुर निकम , झी मीडिया, बुलढाणा : दिवाळीत येणारी लक्ष्मी ही घड्याळाचे काटे अथवा युवराजासोबत नव्हे तर कमळात बसून येईल असा टोला भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारात त्या बोलत होत्या. भाजपच्या 40 स्टार प्रचारकांपैकी त्या एक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर आता त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. विदर्भातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांनी आपल्या शैलीतून कोपरखळ्या मारल्या.
दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मी ही कुण्या युवराजाचा हात पकडून कधीच येत नाही. लक्ष्मी ही बंद पडलेल्या घड्याळाचे काटे पाहून कधीच येत नाही. तर लक्ष्मी ही कमळावर बसून येते अशी खोचक आणि अप्रत्यक्ष टीका त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर केली.
मराठीची जाण असलेल्या स्मृती ईराणींनी मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात केली. चैनसुख संचेती आणि स्वर्गीय नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जुन्या आठवणी बद्दलही त्या बोलल्या. मलकापुरातील लाहोटी जिनिंग प्रेस याठिकाणी स्मृती ईराणींची सभा होती. सभेदरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
भाजपच्या काळात विकासाचा अजेंडा घेऊनच भारताचं नाव जगाच्या पाठीवर नंबर एक वर असणार असल्याचं स्मृती ईराणी बोलल्या. मतदारांना आणि जनतेला माहिती आहे की कोणता पक्ष जिंकून येणार त्यामुळे ते भाजपलाच मतदान करतील असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला.