सोलापूर : कोकणापाठोपाठ आता सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेची अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. नव्याने शिवसेनेत आलेल्या दिलीप मानेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी विरोध करत आहेत. जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना सोलापूर मध्य विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आणि काही पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहेत. ते देखील याच मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र बाहेरून आलेल्या नेत्यांपेक्षा निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. 



कोकणातही नाराजी


कोकणचे आमदार राजन सा़ळवींविरोधात स्थानिक पदाधिकारऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचं काम केल्याचा आरोप शिवसैनिकांनी राजन साळवी यांच्यावर ठेवला आहे. रत्नागिरीत वेळोवेळी विरोधी पक्षाला मदत केली असेही यात म्हटले आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साडेतीनशेहून अधिक स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचं पत्र पाठवण्यात आलं आहे. तिकीट वाटप होण्याआधी राजापूरचे पदाधिकारी पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी राजन साळवी यांना पुन्हा उमेदवारी देणे पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. 


निलेश राणेंनी बाळासाहेबांबद्दल अपमानकारक वक्तव्य करुनही राजन साळवी गप्प राहीले. २००९, २०१४ आणि २०१९ साली रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी साळवी यांनी निलेश राणे यांना सहकार्य केले. मतदार संघामध्ये निधी वाटप करताना मर्जीतील ठिकाणी निधी दिल्यामुळे मतदार संघांमध्ये नाराजी आहे. २०१८ च्या राजापूर नगरपरिषद पोट निवडणुकीत विरोधकांशी आर्थिक तडजोड केली. क्षमता असलेला उमेदवार जाणिवपूर्वक दिला नाही असे आरोप राजन साळवी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.