संजय पाटील, मुंबई : राज्यात अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. काही पक्षांकडून इच्छूक उमेदवारांची मुलाखती देखील सुरु झाल्या आहेत. अशातच एक तरुणाने सोशल मीडियावर विधानसभा निवडणुका लक्षात घेत स्वतःच प्रचार करायला सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगदेव गीते असं या तरुणाचं नाव आहे. चांगदेव उच्चशिक्षित तरुण आहे. चांगदेव हा बीडच्या आष्टी/पाटोदा या मतदारसंघातून आग्रही आहे. चांगदेवचा राजकारणातील प्रस्थापित परंपरेला छेद देण्याचा मानस आहे. राजकारणात किती दिवस सर्वसामान्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या ? या आणि अशा रागातून तसेच राजकारणात येऊन काही सकारात्मक करण्याची इच्छा चांगदेवची आहे.


निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक उमेदवार हे आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर याच उमेदवारांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. चांगदेव जे आश्वासन देणार आहे, ते तो बॉण्ड पेपरवर लिहून देण्यास तयार आहे. 


'आमदारांना भरघोस पगार आणि इतर सोयीसुविधा मिळतात. पण मला निवडून दिल्यास मी पगारातील ३० हजार रुपयेच वेतन म्हणून स्वीकारेल. तर उर्वरित रक्कम ही पब्लिक खात्यात जमा करेन,'अशी ग्वाही देखील चांगदेवने देत आहे.


'निवडणुका म्हटल्यावर पैसेवाटप, दारू-बिर्याणीची पार्टी, असे विविध आश्वासन देऊन मतदाराला आकर्षित केलं जातं. पण मी पडलो तरी हरकत नाही, पण कोणाला दारू पाजणार नाही.' असा निर्धार चांगदेवने केला आहे.


सोशल मीडिया कॅम्पेन


चांगदेवने विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून जोरदार सोशल मीडियावरून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सामान्य घरातील असल्याने चांगदेवला अनेक तरुणांनी सोशल मीडियावर ग्राफिक्स तसेच मोफत प्रचार करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच चांगदेवला अनेक लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे. 


सामाजिक भान


चांगदेवचे वडील हे निवृत्त सैनिक असून ते सध्या शेती करतात. चांगदेव स्वतः बीडसारख्या दुष्काळी भागातून असल्याने त्याला सामाजिक परिस्थितीचे भान आहे. चांगदेवने याआधी अनेक आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. 


राज्यात मध्यंतरी आमदारांची वेतनवाढ करण्यात आली होती. या वेतनवाढीविरोधात चांगदेवने गरीब आमदारांसाठी भीक मागो आंदोलन केले होते.



राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. याविरोधात चांगदेवने आपली एम.फार्मची पदवी विकायला काढली होती.