निवडणूक काश्मीरची नसून महाराष्ट्राची आहे, कॉंग्रेसचा आरोप
महाराष्ट्रामध्ये कलम ३७० नसून कलम ३७१ असे सावंत यावेळी म्हणाले.
मुंबई : अनुच्छेद 370 हा मुद्दा घेऊन घराघरात जाण्याचे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केले. पण काँग्रेसने यावर सडकून टीका केली आहे. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे, काश्मीरची नव्हे असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे. गोरेगाव येथे अमित शाह यांनी अनुच्छेद 370 विषयावर व्याख्यान देताना काँग्रेस सरकारवर निशाणा साधला होता. भाजपातर्फे हा विधानसभा निवडणुकीचा मुद्दा असणार आहे. या पार्श्वभुमीवर सावंत यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रामध्ये कलम ३७० नसून कलम ३७१ असे सावंत यावेळी म्हणाले.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. राज्यावरील कर्ज दुप्पट झाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिप्पटीने वाढल्या तर राज्यातील लघू आणि मध्यम उद्योग बंद होण्याची संख्या चौपट, बेरोजगारी दहापट, भ्रष्टाचार शतपटीने वाढला आणि सरकारची थापेबाजी हजार पटीने वाढली असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथाचे चाक चिखलात का रूतले? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. यावर जाहीरपणे बोलण्याचे आव्हानही सावंत यांनी भाजपाला दिले आहे. भाजपा मूळ मुद्दयावरून राज्याचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत असून आम्ही ते होऊ देणार नाही असेही सावंत यावेळी म्हणाले.