लक्ष्मीकांत रुईकर, झी २४ तास, बीड : विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान बीडमधल्या बहिण - भावाची लढाई आता पोलिसांपर्यंत गेलीय. परळी विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे हे चुलत भाऊ-बहिण एकमेकांसमोर उभे ठाकलेत. धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत ते पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर बदनामीकारक हातवारे करून महिलेची बदनामी केल्या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम ५०० (महिलांसाठी अपमानकारक शब्द वापरणे ), ५०९ (शाब्दिक छेडछाड) आणि २९४ (अश्लील कृत्य) या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. 


धनंजय मुंडे यांनी विडा येथील सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी धनंजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, परळी पोलिसांत जुगलकिशोर लोहिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, भोवळ आल्यानंतर तब्बल चार तासांनी पंकजा मुंडे यांची तब्येत थोडी सावरली. यावेळी त्यांनी बाहेर येऊन भेटण्यासाठी आलेल्या एका महिला प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. यावेळी, पंकजांना भेटायला आलेल्या महिलांच्या डोळ्यात पाणी दिसलं. रविवारी, आष्टी इथे महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांचा निषेध करण्यासाठी आपण मोर्चा काढणार असल्याचं भाजपा नेते सुरेश धस यांनी म्हटलंय.