चोरांनी `एटीएम`मधून पैसेही काढले पण बँकेला थांगपत्ताही लागला नाही
पोलीस आणि बँक अधिकारी यांनी सीसीटीव्ही तपासले असता ही बाब उघड झाली
किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : एटीएमच्या माध्यमातून बँकांना गंडा घालत दुपटीने पैसे उकळण्याचा नवा फंडा नाशिकमध्ये उघड झालाय. पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारांनी नवी शक्कल लढविण्याचे स्पष्ट झालय. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातली ही आहे युनियन बँकेची शाखा... या बँकेत दोन दिवसांपूर्वी तिघे पैसे काढण्यासाठी आले. चोरटे तिघेही परप्रांतीय... चोरीसाठी त्यांनी अत्यंत विचित्र मार्ग शोधून काढला.
पैसे येण्याच्या वेळेस त्यांनी एटीएमचा वीजपुरवठा खंडीत केला. अत्यंत नियोजनबद्धरित्या ही क्रिया केल्याने एटीएममधून पैसे बाहेर येतात पण खात्यातून रक्कम कमी होत नाही. तसंच पैसे न मिळाल्याचा पावतीच्या स्वरूपातला पुरावाही मिळतो, अशी माहिती नाशिक शहर पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली.
पोलीस आणि बँक अधिकारी यांनी सीसीटीव्ही तपासले असता ही बाब उघड झाली. पोलिसांनी शबीर खान, अखलाख खान यांना अटक केली. पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरीत त्यांनी अशा चोऱ्या करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिलीय.
अशा घटना अनेकदा घडतात. मात्र रक्कम कमी असल्याने अधिकारी, पोलिसांच्या ही लक्षात येत नाही असं उघड झालंय. परप्रांतीय टोळी राज्यात अशा चोऱ्या करण्यात सक्रीय आहे. त्यामुळे आता बँकांनी सजग राहण्याची गरज आहे.