नागपूर : गावगुंडांना हटकल्याने एका माजी सैनिकाच्या घरावर नागपुरात हल्ला केल्याची घटना झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे... या गुंडांनी या माजी सैनिकाच्या मुलावर सशस्त्र हल्ला करीत जबर जखमी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नागपूरच्या साईबाबा नगर इथलं बचाले कुटुंब सध्या प्रचंड दहशतीत आहे. मंगळवारी रात्री घराशेजारी धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांना हटकल्यामुळे या गुंडांनी बचाले कुटुंबावर हल्ला केला. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यावर बचाले इथे काही महिन्यांपूर्वीच राहायला आले होते. चार ते पाच गुंडांनी तलवारी घेऊन मंगला बचाले यांच्यावर हल्ला केला. आईवर हल्ला झालेला पाहता मुलगा वैभव प्रतिकार करायला सरसावला. त्याच्या हाताला जबर दुखापत झाली. एवढ्यावर न थांबता गुंडांनी बचाले कुटुंबावर दगड विटांनी हल्ला केला. 


या भागात या गुंडांचा हा नेहमीचाच त्रास आहे. बचाले यांनी या गुंडांना अडवल्यावर त्यांच्यावर थेट हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. दोघांना अटक झालीय. 


अटक झालेल्यात राहुल कामडी याचा समावेश आहे. कामडी हा अट्टल गुन्हेगार आहे. खुनाच्या प्रकरणात तो सध्या जामीनावर आहे. या गुंडांविरोधात आजवर तक्रार करण्याची परिसरातल्या नागरिकांची हिम्मत झाली नाही. पण बचाले या माजी सैनिकाने त्यांना विरोध केल्याने थेट त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अशा गुंडांचा वेळीच सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे.