मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा शासनचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आषाढी एकादशी निमित्त व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पैठण येथील ‘संतपीठ’ सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक  सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला आमदार अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते. यावेळी  संचालक डॉ. धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले सहभागी झाले होते. 


सध्या या संत विद्यापीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्गखोल्या, ग्रंथालय आणि १०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय असलेले वसतिगृह आहे. संतपीठाची इमारत लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात येईल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून संत वाङ्मयाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील, असेही सामंत यावेळी म्हणाले. 


संत वाङ्मयाचा अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण दिले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या रुचिनुसार त्यामध्ये योग्य बदल करुन संत वाङ्मयाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. तो तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणारआहे. या आठवड्यात पैठण येथील संतपीठाच्या जागेची पाहणी करून याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल, असे सामंत यांनी संगितले.