बदलापूर : आपली मुलं चांगल्या संगतीत राहावी, याकडे प्रत्येकच पालकांचं लक्ष असतं. मात्र हीच गोष्ट बदलापुरात एका महिलेच्या जीवावर बेतलीये. कारण मुलाच्या दारुड्या मित्राला आपल्या मुलासोबत न राहण्याची समज दिल्यानंतर त्याने चक्क मित्राच्या आईवर बलात्कार करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोडवरील रमेशवाडी भागात हा प्रकार घडला आहे. महिलेच्याय संकुलात राहणाऱ्या दिनेश गोल्हे नामक मुलाशी पीड़ित महिलेच्या मुलाची मैत्री होती. मात्र दिनेशला दारू पिण्याचं व्यसन असल्यानं या मैत्रीमुळे आपल्याही मुलाला नको त्या सवयी लागतील आणि तो वाया जाईल, अशी भीती पीड़ित महिलेला होती. त्यामुळे त्यांनी दिनेशला आपल्या मुलासोबत राहू नको, अशी ताकीद दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र याचा राग आल्यानं दिनेश याने बदला घ्यायचं ठरवलं आणि १२ डिसेंबर रोजी पीडित महिला घरी एकटीच असताना त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडित महिलेला जाब विचारत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित महिलेने त्याला विरोध केल्यानं त्याने थेट चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवण्यासाठी त्यांनी आपला हात मध्ये टाकला असता दिनेश याने त्यांच्या हातावर वार केले. यावेळी त्या पीडित महिलेने आरडा ओरडा केल्यानं कचरा गोळा करत असलेल्या सफाई कामगार आसमा मुल्ला यांनी सोसायटीच्या लोकांना गोळा केलं. त्यानंतर दिनेश तिथून पळून गेला. 


या घटनेनंतर पोलिसांनी काही तासातच दिनेशला अटक केली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पीडित महिलेवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असलं, तरी त्या मानसिक धक्क्यातून अद्याप सावरलेल्या नाहीत. या घटनेमुळे आपल्या मुलांची संगत कुणासोबत आहे, याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष ठेवण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.