पाण्याचे दाहक वास्तव, जीव धोक्यात घालून धावत्या टँकरच्या मागे महिला
मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे. टँकरमधून गळणारे पाणी भरण्यासाठी महिलांची जीव धोक्यात घालून धावपळ सुरु आहे. घोटभर पाणी मिळेल या आशेने चालत्या टॅंकरच्या मागे पळत पाणी हंड्यात घेण्याचा जीवघेणा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाणीटंचाईची समस्या किती तीव्र आहे, हे दिसून येत आहे. मात्र, प्रशासनाला याचे काही सोयरेसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीमध्ये टँकरमधून गळणारे पाणी हंड्यात भरण्यासाठी महिला टँकरमागे धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'झी २४ तास'ने त्या व्हिडिओची सत्यता तपासली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या वस्तीवर पाण्याची कुठलीही सोय नाही. इथे रस्त्याचे बांधकाम सुरू आह. रस्त्यावरची धूळ उडू नये, यासाठी ज्या टँकरमधून पाणी टाकले जाते, त्या टँकरच्या मागे या महिला धावत जाऊन पाणी घेत असल्याचे समोर आले आहे.
आधीच दुष्काळ त्यात पाण्याचा वानवा आहे. दुष्काळात हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागत आहे. मात्र, एकादा हंडाभरच पाणी मिळत आहे. येथील वाडी वस्तीवर पाण्याची कुठलीही सोय उपलब्ध नाही. याठिकाणी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. रस्त्यावरची धूळ उडू नये यासाठी ज्या टँकरमधून पाणी मारले जात आहे. त्या टँकरच्या मागे जीव धोक्यात घालून या महिला धावत जाऊन पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. रस्त्यावर मारणाऱ्या पाण्यातूनच आपली तहान भागवत असल्याचे चित्र समोर आले आहे.