मुंबई : औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. औरंगाबाद विमानतळाचं नाव आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असं होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'विमानतळाचं नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. औरंगाबाद महापालिकेनेही याबाबतचा ठराव संमत केला आहे. लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे', असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याला मान्यता दिली जाईल. यानंतर केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल.


विमानतळाच्या नामांतरावरुन भाजपने महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. विमानतळ नामकरण झालं, तरी शहराचं नामकरण करण्यापासून पळ काढता येणार नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाव बदलले, तर महाविकासआघाडीतील इतर पक्ष विरोध करु शकतात, म्हणून शहराचं नाव बदलण्याऐवजी विमानतळाचं नाव बदललं. ही पळवाट आहे. आमची शहराचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी कायम आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. 


याआधी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, असं करण्यात आलं होतं. तसंच कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, असं नाव देण्यात आलं होतं.