मुंबई : विधानसभेत आज विविध नामांतराचे ठराव मंजूर झाले. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचे ठराव विधानसभेत मंजूर झाले. तसंच नवी मुंबईतल्या विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा ठरावही विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पद सोडण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. पण नंतर ठाकरे सरकार बहुमताअभावी पडलं. त्यानंतर शिंदे सरकारने नामांतराच्या निर्णयाला मान्यता दिली. औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) यांच्या नामांतराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विधानसभेत नामांतराचे प्रस्ताव मंजूर झाला आहे. 


औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर म्हणून तर उस्मानाबाद शहर आता धाराशिव म्हणून ओळखले जाणार आहे. दुसरीकडे आग्री समाजाची अनेक आंदोलन झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. आता केंद्र सरकारकडे हे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.


केंद्रीय गृह मंत्रालय नामांतराच्या निर्णयावर निर्णय घेईल तर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवला जाणार आहे. केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने या दोन्ही प्रस्ताव मंजूर होणार आहेत. असे मानले जात आहे.


औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा खूप जुना आहे. पण अखेर हा निर्णय झाल्यानंतर आता या दोन्ही शहरात जल्लोष करण्यात आला.