औरंगाबाद: सुब्रोतो रॉयसह सहा संचालकांविरोधात अटक वॉरंट
सहारा समुहानं औरंगाबादेत सुरु केलेला गृह प्रकल्प रखडल्यानं सुब्रतो रॉय आणि सहा संचालकांविरोधात ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केलं आहे. शहरात ८२ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्याची जाहिरात सहाराने केली होती.
औरंगाबाद : सहारा समुहानं औरंगाबादेत सुरु केलेला गृह प्रकल्प रखडल्यानं सुब्रतो रॉय आणि सहा संचालकांविरोधात ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केलं आहे. शहरात ८२ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्याची जाहिरात सहाराने केली होती.
पहिल्या टप्प्यात ५ हजार घरांची घोषणा झाल्यावर, आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली. तसच मूळ रकमेच्या १० टक्के रक्कमही भरली. मात्र, गेल्या ८ वर्षात या जागेवर एक वीटही रचली गेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी ग्राहक मंचाचे दरवाजे ठोठावले. ग्राहक मंचाने तक्रार दाखल करुन घेत, समुहाला १२ टक्के व्याजाने पैसे परत करण्याचे आदेशही दिले.
दरम्यान, सहारा समुहाने ग्राहक मंचाने दिलेले हे आदेश धाब्यावर बसवत कुठलीच हालचाल केली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाने सुब्रतो रॉ़य आणि सहा संचालकांविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. दरम्यान, प्रकल्पाची नियोजीत जागेची निलामी झाली असून, एका प्रसिद्ध व्यावसायिकानं ही जागा विकत घेतल्यानं ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
अॅम्बी व्हॅलीही अडचणीत
दरम्यान, सहारा समुह सध्या अडचणींचा सामना करत आहे. सहारा समुहाचा पुण्यातील मुळशी येथील अॅम्बी व्हाली प्रकल्पही अडचणीत आला आला आहे. इतकेच नव्हे तर, सहारा उद्योगसमूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर, ऑगस्ट महिन्यात अॅम्बी व्हॅली लीलावात निघाली. लिलावासाठी ३७ हजार ३९२ कोटी रुपये एवढी राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, सहारा समूहाने अॅम्बी व्हॅली प्रकल्पाची सध्याची बाजारभावानुसार किंमत एक लाख कोटी रुपये असल्याचा दावा केला आहे.